नरक चतुर्दशी का साजरी करतात?
नरक चतुर्दशी चे महत्व?
श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला.
श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.*
नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते.
या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते.या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्या कृतींमागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.