धनत्रयोदशी चे महत्त्व
दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. हा सण आश्विन वद्य त्रयोदशी पासून कार्तिक शुध्द द्वितीये पर्यंत पांच दिवस साजरा केला जातो. त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा पांच वेगवेगळ्या सणांचा समावेश झालेला आहे.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधींची पूजा करतात. या दिवशी एकत्र येऊन धन्वंतरी देवतेचे मनापासून स्मरण करावे. आयुर्वेदाचा अर्थ "आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान" असा आहे. भारतातील हे आयुर्विज्ञान सर्व जगात पसरले. निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसास रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मुलभूत सिध्दांताचे चिंतन व प्रचार प्रसार होणे आवश्यक आहे.*
धनत्रयोदशीचा हा दिवस आणखी एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो. क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली, त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून "धन्वंतरी" हे पांचवे रत्न बाहेर पडले. श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. यांच्यापासून आयुर्वेद विकास पावला म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापाणी अशा नांवानेही ओळखले जाते. यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला. अनेक वनस्पतींचे औषधीतत्व देवांना समजले. भगवान विष्णुंच्या अवतारात धन्वंतरीची गणना होते.
या दिवशी धन्वंतरीचे पूजन करावे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीचा फोटो मांडून पंचोपचारे पूजा करावी व धन्वंंतरी मंत्राचा एक माळ जप करावा, व नैवेद्य अर्पण करावा. धन्वंतरीचे ध्यानमंत्र व जप हे सर्व सायंकाळी करावे. धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे, व दीर्घायुष्य, आरोग्य यासाठी प्रार्थना करावी. धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते.