एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत काय
असते हो? "
आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची
खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू
नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .
तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी
तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू
शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक
भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली
- " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. "
पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल
त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत
जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या
भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी
मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण
नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी
मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी
विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो
रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली
कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - "
अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे
अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही
शकणार ."
आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो
आजोबांकडे परतला . त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - " मला वाटते
फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला
आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा
असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,
हेतू आणि कुवतीनुसारच करणार."
त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते.
स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू
नका. कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.
तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे .
आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू..